रावेत परिसरातील एका खोलीमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रावेत किवळे रोडवरील एका खोलीत शनिवारी (दि.३) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात बाळासाहेब मनोहर डाडर (वय-३६ रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव शेरी गावठाण, चंदननगर, मुळ रा. मु.पो. नागलवाडी पो. बाभुळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर), दिपक यादव (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळासाहेब डाडर याला अटक केली आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार भगवंता चिंधु मुठे यांनी फिर्याद दिली आहे.
रावेत येथील रावेत किवळे रोडवरील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर त्याठिकाणी छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास रावेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे करीत आहेत.












