ऐतिहासिक भिडे वाड्याची जागा ताब्यात येउन दोन महिने उलटले तरी अद्याप पुनर्विकास करताना ‘वाड्याचे’ डिझाईन कसे असावे, यावर सरकार पातळीवर अद्याप निर्णय झालेला नाही. या निर्णयानंतर निविदा प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबींसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी ‘भुमिपूजना’ची कुदळ पडण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिवाजी रस्त्यावरील भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू करत महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. भिडे वाड्यातील शाळेचे ऐतिहासिक स्मारकामध्ये रुपांतर करण्यात यावे अशी विविध घटकांकडून अनेक वर्षे मागणी होत होती. वेळोवेळी राज्यातील शासनकर्त्यांनी याला मान्यताही दिली. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने अनेकवर्षे भूसंपादन रखडले होते. नुकतेच दोन महिन्यांपुर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत भाडेकरूंना योग्य तो मोबदला देत भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाड्याचा ताबा घेउन धोकादायक वाडा पाडून टाकला.
वाड्याच्या पुर्नविकासासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार सातहून अधिक आर्किटेक्टने सध्याच्या विकास नियमावलीनुसार प्रस्तावही सादर केले. या प्रस्तावांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे अध्यक्ष तसा राज्यातील मंत्री छगन भुजबळ हे देखिल पस्थित होते. याठिकाणी पुन्हा शाळा सुरू करावी असा आग्रह भुजबळ यांनी धरला आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आली आहेत. परंतू साधारण पावणेतीन गुंठे जागेमध्ये पाच मजल्यापर्यंत इमारत उभी करणे, पार्किंगची अडचण, शहराच्या प्रचंड गर्दीच्या शिवाजी व लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकालगतच ही वास्तू असल्याने अगदी बांधकामापासुन वापरापर्यंत येणार्या अडचणी असे अनेक प्रश्न यातून समोर आले आहेत. यामुळेच या स्मारकाच्या ठिकाणी शाळा असावी की ऐतिहासिक भिडे वाड्याची रिप्लिका उभारण्यात यावी, यावरून गोंधळ सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय होउ शकलेला नाही.
वाड्याच्या डिझाईनबद्दल शासन स्तरावरून अंतिम निर्णय आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. ही निविदा आल्यानंतर प्रशासकीय मान्यता व विकसकाला वर्क ऑर्डर देणे ही तांत्रीक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. यासाठी साधारण तीन आठवड्यांहून अधिकचा कालावधी लागणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होउन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत निविदा जाहीर न झाल्यास आचारसंहितेपुर्वी भिडे वाड्याच्या भूमिपूजनाची कुदळ पडण्याची शक्यता धूसर होणार असल्याचे दिसत आहे.












