तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून निलंबनाची शिफारस लोकसभेच्या नितीमत्ता समितीनं काल दि.९ स्वीकारली . विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेससोबत इंडिया आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेसच्या सध्या निलंबित असलेल्या खासदार प्रणीत कौर यांनी या शिफारशीच्या बाजूनं मतदान केलं.
कौर या माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. आता मोईत्रा यांचं निलंबन करायचं की नाही याबद्दल संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतील . लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचा पासवर्ड मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी नावाच्या एका व्यापाऱ्याला देऊन त्याबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर केला आहे.
यासंदर्भात संसदेच्या नितीमत्ता समितीसमोर सुनावणी झाली. समितीच्या सहा सदस्यांनी निलंबनाच्या ठरावाला मान्यता दिली तर चार विरोधी पक्षांतील सदस्यांनी या ठरावाच्या विरोधात मत दिल्याची माहिती समोर येतेय.












