भारताने न्यूझीलंडवर सेमीफायनलमध्ये 70 रन्सने दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आता अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबादमध्ये फायनल मॅच खेळणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शामीच्या सात विकेट्सच्या खेळीवर भारताने विजयी निश्चित केला.
सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला.
त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला. 79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली.
50 ओव्हर्सनंतर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली. शामीनेच या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. डेवेन कॉन्वे आणि रचिन रविंद्र हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डेरेल मिचेल या दोघांनी 180 धावांची भक्कम भागीदारी रचत न्यूझीलंडला मॅचमध्ये जीवंत ठेवले.
त्यानंतर शामीनेच धोकादायक बनलेल्या या भागीदारीला फोडत भारताला पुन्हा मॅचमध्ये आणले. त्यानंतर मात्र न्यूझीलंडची टीम सावरु शकली नाही. शामीने दणदणीत सात विकेट्स घेत न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुंग लावला. अन्य बॉलर्स मार खात असताना शामी आणि कुलदीप या दोघांनी चांगली बॉलिंग करत भारताच्या विजयाचा कळस चढविला.












