पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : लोणावळा पोलीस मागील काही दिवसांपासून अँक्शन मोडवर आले असून नियम न पाळणाऱ्या टपरी व हातगाडी धारक, रहदारीला अडथळा ठरतील अशी वाहने उभी करणारे वाहन चालक, रस्त्यावर दुकानांच्या पाट्या लावणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई मोहीम सुरू केली आहे.
गुरुवारी लोणावळा बाजार भाग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत ६३ जणांवर कारवाई करत ४८ हजार ८०० रुपयांची दंड वसूल केला. अचानक राबवण्यात आलेल्या ह्या कारवाई मोहीममुळे व्यवसायिक टपरी धरकांचे धाबे दणाणले आहेत. तर यापुढील काळात देखील लोणावळा शहरात व हायवेवर अनधिकृतपणे फळे विकणारे व्यवसायिक,अन्न पदार्थ विक्री करणारे स्टॉल धारक, रस्त्यावर कशाही गाड्या लावणारे चालक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते, त्यातच रस्त्यावर अतिक्रमणे करून फळे व अन्न पदार्थ विक्री करणारे स्टॉल लावतात, दुकानदार रस्त्यावर दुकानांचे बोर्ड लावतात, यामुळे होणाऱ्या कोंडीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असल्याने या कारवायांमध्ये सातत्य ठेवत नियम न पळणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करणार असल्याने लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
६३ पैकी ३२ केसेस ह्या नो पार्किंगच्या आहेत तर उर्वरित ३१ केसेस रस्त्यावर फळे विकणारे विक्रेते, रस्त्यावर बोर्ड लावणारे दुकानदार, रस्त्यावर अन्न पदार्थ विकणारे स्टॉल धारक यांच्यावर करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मॅगी पॉईंट याठिकाणी रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणार स्टॉल धारक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते तर आठ दिवसांपूर्वी टायगर पॉईंट याठिकाणी स्टॉल धारक व हुल्लडबाज पर्यटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरची कारवाई लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डूबल, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, शकिल शेख, वाहतूक विभागाचे अनिल शिंदे, सचिन कडाळे यांच्या पथकाने केली.












