टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील तरुणाची 1 लाख 9 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 3 नोव्हेंबर दरम्यान तरुणाच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.
याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक नंदु भराड (वय-28 रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन टेलीग्राम आयडी धारकांवर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक भराड हे त्यांच्या घरी असताना सायबर चोरट्यांनी टेलीग्राम द्वारे संपर्क साधला. ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादी यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र, त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचा टास्क अथवा घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक भराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक करीत आहेत.












