पिंपरी (प्रतिनिधी) इंग्रजांनी आणलेल्या शिक्षणात अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि संस्कृतीचा अंतर्भाव केलेला नाही. आजच्या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थी कर्तृत्ववान बनले मात्र कुशल बनले नाही. त्या काळात म. गांधीजी इंग्रजांना म्हणाले की, तुमचे शिक्षण हे कुशलतेकडून अकुशलतेकडे नेणारे आहे. असे उदगार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले. पिं.चिं. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शहरातील आदर्श शाळा,गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शहरातील ४ शाळा, ९ मुख्याध्यापक, १६ शिक्षक, ७ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी पुणे जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, कॅंप एज्युकेशन रसिकलाल धारीवाल व्यवस्थापन कॉलेजचे संचालक डॉ भरत कासार,कॅंप एज्युकेशन निगडी संकुलाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी इथापे , पिं.चिं. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, सचिव संभाजी पडवळ, कार्याध्यक्ष अशोक जाधव, खजिनदार बाबाजी शिंदे, सहसचिव
हनुमंत मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षकाची जबाबदारी या विषयावर प्रा. प्रदीप कदम यांनी व्याख्यान दिले , शिक्षक हा समाजाचा कणा असतो त्यामुळे शिक्षकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे ही काळाची गरज आहे.
हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असता शिक्षकांनी केलेल्या कार्याची ही अनुभूती, मुख्याध्यापक संघाने घेतलेली दखल आहे. असे प्रा. प्रदीप कदम म्हणाले.
शिक्षक हा विद्यार्थिनीष्ट, विद्यार्थी हा ज्ञाननिष्ठ,ज्ञान हे समाजनिष्ठ असायला हवे आणि समाज हा समतानिष्ठ असायला हवा.असेही प्रदीप कदम म्हणाले.
प्रभुणे पुढे म्हणाले कि, प्राचीन काळात समाजावर संकटे आल्यावर कुप्रतेच्या विरोधात सर्व ऋषीमुनीं एकत्रित येवून विचारातून मार्ग काढायचे. आज हेच कार्य मुख्याध्यापक संघ करीत आहे. शे दीडशे वर्षापासून शिक्षकांची मातीशी योग्य नाळ जुळली नाही. समाज आणि शिक्षक एकत्रित येत नसल्याने समाज विघटित होत आहे. अशी खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.
पुस्तकात शिवरायांच्या शौर्याच्या थोडक्यात कथा मांडल्यात मात्र शिवकालीन अर्थव्यवस्थेचा उल्लेख नाही. कधी नव्हे आता कुठे तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था सरळ होताना दिसत आहे, याबाबतीत अभ्यासात माहिती समाविष्ट केलेली नाही. अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्राचार्य सुबोध गलांडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष काळे यांनी आभार मानले.नाना शिवले, गौतम दळवी यांनी सूत्रसंचलन केले.












