विश्रांतवाडी हद्दीतील महावितरण कार्यालय धानोरी विभाग येथे सहायक अभियंता म्हणून कार्यरत असणार्या एका ३८ वर्षीय महिलेला पुण्याच्या लाचलुचपत विभागाने लाच घेताना ताब्यात घेतले आहे.
सहायक अभियंता हर्षाली ढवळे (वय ३८) असे लाच घेणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे.
या घटने बद्दल अधिक माहिती अशी कि, यातील तक्रारदार हे लायझनींगच्या कामासाठी विद्युत ठेकेदाराकडे नोकरी करत आहेत. ग्राहकाची वीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी कागदत्रांची पुर्तता करुन महावितरणच्या धानोरी शाखा कार्यालयात गेले असता, त्या कार्यालयातील लोकसेवक श्रीमती हर्षाली ढवळे, सहायक अभियंता यांनी यापुर्वीचे केलेल्या ०३ थ्री फेज कामाचे व सध्याचे ०१ थ्री फेजचे वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक श्रीमती हर्षाली ढवळे, सहायक अभियंता यांनी यापुर्वीचे केलेल्या ०३ थ्री फेज विद्युत मीटर कामाचे व सध्याचे ०१ थ्री फेजचे प्रलंबित वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी तडजोड करून अखेर प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे एकुण १२ हजार रुपयांची मागणी केली. या कारणास्तव लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यामध्ये त्याना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या महिला अभियंतेला अटक (Corruption)












