जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. तसेच, पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला होता.
या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यात मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतांना जालना पोलिसांनी ऋषिकेश बेदरे यांना शुक्रवारी अटक केली आहे. तसेच, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस देखील पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बेदरे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे.












