मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने बुधवारी (ता. 24 जानेवारी) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ते बुधवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. रोहित पवार चौकशी होत असताना शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयात बसून राहणार आहेत. यानंतर रोहित पवारांनी चौकशीपूर्वीच ईडीविरोधात दंड थोपटले आहेत.
म्हणाले, ईडी कार्यालयात बुधवारी चौकशीला जाणार आहे. यापूर्वी केले तसेच आताही अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचे सुडाचे राजकारण पाहता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे. याच दबावातून ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, असे आवाहन पवारांनी केले.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाजवळच ईडीचे कार्यालय आहे. रोहित पवारांची चौकशी होत असताना शरद पवार आपल्या पक्ष कार्यालयात बसून राहणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे या रोहित यांना सोडायला जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडीविरोधात निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. यातून शरद पवार कार्यकर्त्यांमागे कणखरपणे उभे राहतात, हेच स्पष्ट होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.
रोहित पवार म्हणाले, माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण समजण्याच्या पलिकडचे आहे. पण तरीही सर्व जण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः आदरणीय पवारसाहेब येत आहेत. वय झाले म्हणून काय झाले? वय झालेली माणसे तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी ‘बापमाणूस’ म्हणून ढाल बनून उभीही राहतात. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय, असे म्हणत रोहित पवार ईडी चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.












