पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे ओडिसी या नृत्यकलेविषयी अभ्यासपूर्ण विवेचन व प्रात्यक्षिकासह सादरीकरणाचा कार्यक्रम सोमवार, दि. 4 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रामिंदर खुराना या नृत्यकलेविषयी प्रात्यक्षिकासह अभ्यासपूर्ण माहिती देणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भरतनाट्यम् नृत्यांगना कल्याणी साळेकर-पाटील यांचे नृत्यसादरीकरण होणार आहे, अशी माहिती आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
रामिंदर खुराना या सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आहेत. त्यांनी नृत्याचे शिक्षण गुरू केलुचरण महापात्रा आणि गुरू नटावर महाराणा यांच्याकडून घेतले आहे. ओडिसी नृत्यप्रकारा व्यतिरिक्त त्यांनी गुरू गोपीकृष्ण यांच्याकडून कथक नृत्याचे तर इंदुमती लेले यांच्याकडून लोकनृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. भारतीय सांस्कृतिक कार्य परिषद आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. समर्पक भावमुद्रा व रेखीव डौलदार हालचाली हे खुराना यांच्या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.
कल्याणी साळेकर-पाटील यांनी भरतनाट्यम् नृत्यशैलीतील विशारद, नृत्य कलाभूषण पदवी प्राप्त केलेली असून गुरू मैत्रेयी बापट यांच्याकडून त्या आजही नृत्य प्रशिक्षण घेत आहेत. कल्याणी साळेकर-पाटील या भारतीय सांस्कृतिक संबंध क्षेत्रीय समितीच्या पुण्यातील विभागीय कार्यालयातील नृत्य विभागाच्या सल्लागार समिती सदस्य आहेत.












