दोन वर्षांनी होणारं मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक पर्वणी असतं. अधिवेशनात वैचारिक मेजवानी तर असतेच त्याचबरोबर आपण एका राष्ट्रव्यापी, सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेबरोबर आहोत याचा आनंदही येणारया प्रत्येक सदस्यांच्या चेहरयावर विलसत असतो.मराठी पत्रकार परिषदेची सदस्य संख्या अफाट असलयानं प्रत्येकाला व्यक्तीगत निमंत्रण पाठवणं शक्य होत नाही.नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाते.तरीही सारेजण येतात.घरचं कार्य असल्यासारखा अधिवेशनात त्यांचा वावर असतो.गेल्या पंधरा वर्षात आम्हाला निमंत्रण नाही अशी तक्रार माझ्याकडं एकानंही केली नाही.मला वाटतं, मराठी पत्रकार परिषद हे एक कुटुंब आहे याच भावनेनं सारयांचा व्यवहार असतो.त्यामुळं तीन हजारांवर पत्रकार येऊनही कुठं वाद झालाय, गोंधळ झालाय असं कधी घडलं नाही.अधिवेशन शिस्तीत होते.शांततेत होतं.मला वाटतं आपल्या पुर्वजांनी संघटनेची ज्या पध्दतीने आणि ज्या ध्येयानं बांधणी केली आहे त्याचं हे फलीत आहे.अनेकदा असंही होतं की, काही संघटना गर्दी जमवण्यासाठी राजकीय नेत्यांना सभेला बोलवतात. परिषदेला याची गरज कधी वाटली नाही.संभाजीनगर अधिवेशनावेळेस
सरकार पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन सारख्या विषयाकडे दुर्लक्ष करते म्हणून कोणत्याही राजकीय नेत्याला अधिवेशनास बोलवायचे नाही असा निर्णय आपण तेव्हा घेतला होता.कोणीही मोठा सेलिब्रिटी नव्हता तरीही 2000 पत्रकार उपस्थित होते.तेही शेवटपर्यंत म्हणजे कोणी असो, नसो पत्रकार परिषदेवर प्रेमापोटी श्रध्देपोटी अधिवेशनास येतात.हे प्रेम, ही शिस्त, हा एकोपा, हा आपलेपणा, हा परस्पर विश्वास तुम्हाला अन्य कोणत्याही पत्रकार संघटनेत दिसणार नाही. त्यामुळंच अधिवेशन मग ते रोहयाचं असो, पिंपरी चं असो, संभाजीनगरचं असो, शेगावचं असो, नांदेड चं असो नाही तर एक वर्षांपुर्वी झालेलं पिंपरी-चिंचवडचं असो ही सारी अधिवेशन अविस्मरणीय आणि संस्मरणीय ठरली. मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की, या सर्व अधिवेशनाचं नेतृत्व करण्याची, येणारया पत्रकारांचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली.या निमित्तानं चादयापासून बांध्यापर्यत पत्रकार मित्र माझ्याशी जोडले गेले. राज्यातील पत्रकारांचं अलोट प्रेम देखील मला मिळालं. मला याची कल्पना आहे की, ही अधिवेशनं असतील अथवा आंदोलनं आपल्या सक्रीय सहभागामुळे यशस्वी होतात.आम्ही सारे पदाधिकारी निमित्तमात्र आहोत.परिषदेवरचं आपलं हे प्रेम पुढील काळातही कायम राहिल अशी खात्री आहे.
सकाळी सकाळी हे सारं आठवण्याचं कारण असं की पिंपरी – चिंचवड अधिवेशनाला नुकतंच एक वर्ष झालं. तीन हजारावर पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित होते.मी अभिमानानं सांगू शकतो की, देशात, हो देशात अशी दुसरी कोणतीही पत्रकार संघटना नाही की, त्याच्या अधिवेशनाला 3000 पत्रकार येतात.ही ताकद परिषदेची, ही पुण्याई आपल्या पुर्वजांनी आहे. ही उपस्थिती पाहून सारेच थक्क होतात.. पिंपरी – चिंचवडमध्ये एक नेते मला म्हणाले, “खरंच हे सारे पत्रकार आहेत का” ? लगेच मी दोघा – चौघांना बोलावलं, त्यांना त्यांचं गाव, दैनिकांचं नाव विचारलं.कोणी नांदेडचे होते, कोणी चंद्रपूरचे होते, कोणी धुळ्याचे तर कोणी सावंतवाडीचे होते.संबंधित नेते थक्क झाले. एवढे पत्रकार एकत्र येऊ शकतात हेच त्यांना मान्य होत नव्हतं.. राज्यात असा एकही तालुका, जिल्हा नसेल की, जिथला प्रतिनिधी अधिवेशनाला आला नाही.. हजारो पत्रकार येतात आहे त्या व्यवस्थेत आनंद मानतात.कारण सर्वांनाच याची कल्पना असते की, 3000 लोकांची दोन दिवस व्यवस्था करणे सोपे नसते.परंतू हे शिवधनुष्य सर्वच अधिवेशनाच्या संयोजन समितीनं लिलया उचललं. पिंपरी – चिंचवडच्या संयोजन समितीनं देखील अनेक अडथळे पार करीत जिद्दीनं हे अधिवेशन यशस्वी करून दाखविले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनास येऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न झाले.संस्थेवर प्रशासक आहे इथपासून ते एस.एम देशमुख सरकार विरोधी आहेत इथपर्यंत अनेक वावड्या उठविल्या गेल्या.. पण परिषदेची ताकद पाहून दुसरया दिवशी का होईना मुख्यमंत्र्यांना यावं लागलं.. या निमित्तानं मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मला सर्वच राजकीय पक्ष सारखे आहेत. मी कोणाची मिंधा नाही, माझी कुठल्या राजकीय पक्षाशी सलगी नाही वा दुरावाही नाही.. मी पत्रकारांच्या हक्काची भाषा बोलतो, पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरतो आणि चौथ्या स्तंभाचं अस्तित्व, स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून मी डोळ्यात तेल घालून पहारेकरयाची भूमिका पार पाडतो. ही भूमिका कोण्या राजकीय पक्षाच्या विरोधात जात असेल तर त्याला माझा इलाज नाही. कुठल्याही परिस्थितीत आणि जिवात जीव आहे तोपर्यंत मी घेतलेला हा वसा टाकणार नाही.हे खरं तर राजकीय मंडळींनी समजून घ्यायला हवं. ते समजून घेणार नसतील आणि अधिवेशनाला येणार नसतील तर आमचं काहीच अडणार नाही. त्यामुळेच आम्ही अधिवेशनाचे उद्घाटन एका पत्रकाराच्या हस्तेच करण्याचा निर्णय घेतलाय.नांदेडचे उद्घाटन पी . साईनाथ यांच्या हस्ते झालं, पिंपरी चिंचवड अधिवेशनाचं उद्घाटन कुमार कदम यांनी केलं.पुढील अधिवेशनाच्या उद्घाटनाला देखील एका मान्यवर पत्रकारालाच निमंत्रित केले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या.त्यातील काही पूर्ण झाल्या. मात्र परिषदेच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली 25 लाखांची घोषणा एक वर्ष झालं तरी प्रत्यक्षात आलीच नाही असं सांगितलं गेलं की, काहींनी आक्षेप घेतले, तक्रारी केल्या. हे आक्षेपकर्ते कोण आहेत, माहिती नाही मात्र राज्य सरकारने परिषदेबददल नितीन गडकरी काय बोलले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नये.. गडकरी म्हणाले,” मराठी पत्रकार परिषदेसारख्या संस्था जगल्या पाहिजेत, देशातील लोकशाही आणि पत्रकारिता टिकविण्यासाठी ते आवश्यक आहे.” गडकरी म्हणतात, ते खरं असेल तर मग ही सरकारची जबाबदारी आहे.त्यासाठी सरकारने परिषदेला आर्थिक मदत करून ही संस्था जोपासली पाहिजे.किमान ज्या घोषणा केल्यात त्याची तरी पूर्तता केलीच पाहिजे. असो.पिंपरी चिंचवड संयोजन समितीनं सर्व उत्तम व्यवस्था केली होती. जेवणही उत्तम होते त्यामुळेच चिभेवरची ही चव आणि अधिवेशनाच्या सुखद आठवणी आम्ही एक वर्षानंतर देखील विसरलेलो नाहीत. त्याबद्दल पिंपरी चिंचवडमधील परिषदेशी जोडलेल्या सर्व शिलेदारांचं मनापासून आभार. 2024 मध्ये होणारया अधिवेशनाच्या स्थळाचा शोध सुरू झाला आहे. लवकरच त्याबाबत देखील घोषणा केली जाईल.
एस.एम देशमुख












