मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील २४ भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यात रिंगाण कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. १२ मार्च २०२४ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुरस्कारांसाठी निवडलेल्या कलाकृतींला आणि साहित्याला मंजुरी दिली. यानंतर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी (२० डिसेंबर) रवींद्र भवन येथील साहित्य अकादमी भवनात या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ च्या विजेत्यांची घोषणा केली.
यावर्षी २४ भारतीय भाषांमधील नऊ काव्यसंग्रह, सहा कादंबर्या, पाच कथासंग्रह, तीन निबंध आणि एक समीक्षेच्या पुस्तकांची पुरस्कारांसाठी निवड झाल्याची माहिती दिली.












