पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपरी गावातील वाघेरे बिल्डिंगजवळ एका महिलेचा रविवारी (दि.१७) रात्री साडे दहाच्या सुमारास विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन पिंपरी पोलिसांनी त्या महिलेच्या पतीला अटक केली आहे. याबाबत मृत महिलेच्या वडिलांनी पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
अजय मोहन बिडलान (वय – ३२ रा. सुभाषनगर, पिंपरी) असे आरोपी पतीचे नाव असून त्याच्यावर आय.पी.सी. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सुजित सतपाल शिल्ले (वय-४९ रा. तथागत हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत महिला हे पती पत्नी आहेत.
फिर्यादी यांच्या मुलीने पती विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता. तसेच आरोपी फिर्यादी यांच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच आरोपी पत्नीचे तोंड आणि नाक दाबून खून केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे बोबडे करीत आहेत.
दरम्यान, स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला पार्लर व्यवसाय करीत होती.महिन्याभरापूर्वीच ती पिंपरी गावातील वाघेरे चाळीत राहायला आली होती.पोलिसांनी मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्य़ादीवरुन आरोपी पतीला अटक केली आहे.












