संबंधित मालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केजूदेवी बंधारा थेरगाव येथे मागील काही दिवसांपासून पवना नदीमध्ये पांढऱ्या रंगाचा फेस तयार होवून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत होते. महानगर पालिकेच्या वतीने या अनुषंगाने पर्यावरण व जलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताथवडे भागात सर्वेक्षण करत असताना असे आढळून आले की, ताथवडे येथील २४ क्लेन (मेसर्स क्लेनफॅब सर्विसेस एल. एल. पी) या ड्रायक्लिनर्सच्या कंपनीने ड्रायक्लिन करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनयुक्त पाणी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता महापालिकेच्या जलनि:सारण नलिकेस जोडले होते. सदर कंपनीने हि नलिका विना परवाना व नगरपालिकेला कुठलीही पूर्वकल्पना न देता जोडली होती. सदर रसायनयुक्त पाणी हे काळपट निळसर व फेसयुक्त होते.
सदर ड्रायक्लिन कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेने तक्रार दिली असून संबंधित मालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई ही जलनि:सारण व पर्यावरण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य निरिक्षक अमोल गोरखे, गोरक्षनाथ करपे, कनिष्ठ अभियंता संदिप पाडवी, सचिन मगर यांच्या वतीने करण्यात आली.
यापुढेही असला कुठलाही प्रकार आढळून आल्यास अशी कारवाई आम्ही करत राहणार असून अशा प्रकारच्या नदी प्रदूषण करणा-या व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी देखील महापालिकेस त्वरित कळवावे असे आवाहन पर्यावरण सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला आहे.












