दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या तरुण विध्यार्थीला शिवीगाळ करुन हत्याराने मारहाण करुन जखमी केल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील कृष्णा सागर हॉटेल समोर घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संतोषनगर, कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमिन मुल्ला, आयान शेख, तनवीर शेख व आबु रेहमान यांच्यावर भा.दं.वि.कलम ३२४, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल मंगळवारी दहावीचा पेपर सुटल्यानंतर घरी जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला हाक मारुन थांबवले. आरोपींनी मृणाल याच्याजवळ येऊन तुला खुप माज आलाय का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एका आरोपीने त्याच्या हातातील धरदार हत्याराने मृणाल याच्या डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी करुन आरोपी तेथून पळून गेले. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल भोसले करीत आहेत.












