पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : अंंमली पदार्थ विरोधी पथकाने साडेसात किलो गांजा सह एकाला संत तुकाराम नगर, पिंपरी येथून अटक केली आहे. हि कारवाई दि.६ रोजी दुपारी करण्यात आली आहे.
जितेंद्र मगन कोळी (वय ३३ रा. शिरपूर, धुळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अंंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर उभा आहे अशी त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती, सदरची खबर अंंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ७ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा ७ किलो ४३८ ग्रॅम वजनाचा गांजा व १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ७ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी हा तेथे गांजा विक्रीसाठी आल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्ट. अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.












