भारतिया जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भाजपा कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला संबोधित करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतात तिसऱ्यांदा भाजपा सरकार येणार आहे. विकसित भारताचे स्वप्न पुढील पाच वर्षात पूर्ण होईल. मागचा दहा वर्षांचा काळ फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. पुढची पाच वर्ष मागील दहा वर्षांपेक्षा भारी असणार आहेत.
मोदींच्या तिसऱ्या टर्मवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढची पाच वर्ष विकासाची मुहूर्तमेढ रोवणारी, भारताला आर्थिक महासत्ता बनविणारी, गरीबी निर्मुलनाच्या अंतिम लढाईची असतील. या पाच वर्षात जगाला हेवा वाटावा, असा विकास होणार आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पंतप्रधान मोदींनीही भारताची सेवा करण्याचा संकल्प सोडलाय. विकसित भारत करण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता हवी आहे. मोदींच्या दहा वर्षांच्या काळात बदललेला भारत आणि जगात भारताची बदललेली प्रतिमा तुम्ही पाहिली. भारताचा आत्मसन्मान, स्वाभिमान, आत्माभिमान बदलताना पाहिला. एक मजबूत भारत आपण पाहिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतात रस्ते, रेल्वे आणि विमानतळ झाले. गरीबांना कल्याणाच्या योजना मिळाल्या. घर, शौचालय, सिलेंडर मिळाले. तरुणाईला स्टार्टअपसाठी कर्ज मिळाले. अनेक योजना दहा वर्षात झाल्या. पुढील पाच वर्ष यापेक्षाही अधिक पटीने भारताची प्रगती होईल, असा दावा फडणवीसांनी केला.












