पुणे शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, कोंढवा आणि हडपसर परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी पावणे नऊ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. पुणे शहरात दिवसा ढवळा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोलेदीना रोडवरील एका सोसायटी मधील सदनिका चोरट्यांनी फोडून पाच लाख ६० हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार सोमवारी (दि.१५) सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याबाबत नरेंद्र पोपटलाल शहा (वय-६५ रा. गितांजली कुंज सोसायटी, मोलेदीना रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. नरेंद्र शहा हे सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून त्यांच्या दुकानात गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील लाकडी डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दुपारी तीन वाजता घरी आले असता चोरी झाल्याचे शहा यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दीड तासात घर साफ
पती पत्नी घरातील सामान खरेदी करण्यासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार कोंढवा येथील हनुमान आझाद चौकातील मोरया निवास येथे शनिवारी (दि.१३) रात्री सात ते साडे आठ या कालवाधीत घडला आहे. चोरट्यांनी दीड तासात घरफोडी करुन किमती ऐवज चोरुन नेला. याबाबत विशाल बाळासाहेब कामठे (वय-३३) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मांजरी मध्ये दागिने लंपास
मांजरी परिसरातील महादेव नगर येथील लडकत कॉम्पलेक्समधील फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री साडे सात ते सोमवारी (दि.१५) रात्री सात या कालावधीत घडली आहे. याबाबत विकी भारत वनसाळे (वय-३१) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे.
मांगडेवाडी येथील वर्कशॉपमध्ये चोरी
मांगडेवाडी येथील हॉटेल करीता लागणारे साहित्य बनवणाऱ्या बालाजी एंटरप्राइज या वर्कशॉपमधून चोरट्यांनी लॅपटॉप, स्पीकर, मोबाईल असा १० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि.१५) रात्री साडे आठ ते मंगळवारी (दि.१६) सकाळी साडे सातच्या दरम्यान घडला आहे. आरोपींनी वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून वस्तू चोरुन नेल्या. याबाबत महेंद्र नारायण चोरगे (वय-४५ रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.












