पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून पुण्यातील वास्तव परिस्थितीवर आधारित अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. ‘प्रत्येक समस्येवर एकच उपाय तो म्हणजे काँग्रेस!’ या आशयाचे पोस्टर लावून काँग्रेसच्या काळात झालेल्या कार्याची माहिती या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
पुणे हे आधी विद्येचे माहेरघर होते. आज ते ट्रॅफिकचे घर झाले आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. पुण्यातील वाढते प्रदूषण, बेरोजगारांची वाढती संख्या म्हणजे या सगळ्या समस्यांवर काय उपाय असेल तर तो म्हणजे काँग्रेस आहे. सगळ्या समस्या संपवायच्या असतील, तर काँग्रेस हा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे. या अशयाचे पोस्टर पुण्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
सुरवसे पाटील म्हणाले, “पुण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहराला खासदार नाही, नेता नाही. वाहतुक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढली आहे. ड्रग तस्करी आणि गुन्हेगारांना मिळालेली मोकळीक चिंतेचा विषय बनला आहे. या सगळ्या समस्या सोडवण्यात भाजपला अपयश आले आहे. काँग्रेसच या सगळ्यावर उपाय देऊ शकतो. काँग्रेसने केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत.”












