पुणे येथील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोसले नगरमध्ये जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरांनी एका बंगल्यातून तब्बल ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय ५२, रेंज हिल रोड, भोसले नगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चतुर्श्रुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या किचनच्या खिडकीचे स्लाइडिंग अज्ञात व्यक्तीने उखडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मधील कपाट उचकटून त्यामधील दोन लॉकर व त्यामध्ये असलेले ३२ लाख ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, डायमंड चोरून नेले आहेत. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.












