पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : पुण्यात दिवाणी न्यायालयातील बेलिफला लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
लक्ष्मण नथू काळे ( वय ४० वर्षे, पद बेलिफ (वर्ग ३), दिवाणी न्यायालय,शिवाजीनगर, पुणे ) आणि त्याच्या एका साथीदारा विरुद्ध फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात जमिनीच्या संदर्भात दावा दाखल केला होता.त्यामधील प्रतिवादी यांना कोर्टात हजर राहणेसंबंधी समन्स बजाविणेचे काम आरोपी हे करत होते. त्यावेळी सदरचे समन्स वेळेत बजावून त्याचा रिपोर्ट न्यायालयात देण्यासाठी आरोपी यांनी फिर्यादींकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.तसेच या प्रकरणात त्यांना अन्य कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आरोपीवर भादवी कलम भ्रष्टाचार अधिनियम कलम ७,१२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले या करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.












