पुणे पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहर पोलीस दलात पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सलग दोन दिवस शहरातील गुंडाची आयुक्तालयात परेड घेतली. त्याच्या पाठोपाठ आता नागपूरातही नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ३१७ गुंडांची पोलीस आयुक्तालयात परेड करण्यात आली. पुढील काळात कायदा हातात घेऊन कुठलाही गुन्हा केल्यास कठोर कारवाई करण्याचा या गुंडांना इशारा देण्यात आला.
पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. सिंगल यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सक्रीय गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात ३१७ सक्रीय गुन्हेगार बुधवारी हजर झाले. प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर असल्याचे तसेच यापुढे कोणत्याही गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास कठोर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला. मोका, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईचा इशारा या गुंडांना देण्यात आला.
पोलिसांनी २००८ पासूनच्या गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. पोलीस आयुक्तालयात हजर असलेल्यामध्ये अनेक नामचीन गुंड, खूनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची संख्या अधिक होती.पोलिसांनी या सर्व गुन्हेगारांची डाटा बँक तयार केली आहे. त्यांच्यावर हालचालीवर नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सावकारांविरोधात मोहिम
सावकार कर्ज देण्याच्या नावाखाली गरजवंताचे रक्त शोषणाचे काम करतात.
अशा बेकायदा सावकारी करणार्यांविरुद्ध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले












