पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून प्रफुल्ल जयवंत कोळी ( वय ३०, रा. ता. अलिबाग, जि. रायगड ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीवर २०२१ मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीने स्वतःची नसलेली मासेमारीची बोट माझीच आहे असे भासवत तिच्या खऱ्या मालकाच्या परवानगीशिवाय खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने भलत्याच व्यक्तीकडून तीन लाख ऐंशी हजार रुपये घेऊन त्या व्यक्तीची फसवणूक केली होती. तेव्हापासून आरोपी हा गायब होता.
दि. १५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट – १ कडून कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यामध्ये पोलिस पुणे शहरातील हॉटेल आणि लॉजेस ची पडताळणी करत असताना समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजधानी हॉटेलच्या रजिस्टर मध्ये आरोपी याची नोंद दिसली.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर आरोपीची माहिती काढली असता हा दोन वर्षांपूर्वीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदर आरोपीस पुढील कारवाई साठी कुलबा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १, श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद, पोउनि सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, अभिनव लडकत, आण्णा माने व महेश बामगुडे यांनी केली आहे.












