सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदलहोत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. या 11 जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असू शकते.
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके आणि इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत.
म्हणून तर या कालावधीत पीकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा आणि जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळ्याविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो. तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.












