गेल्या काही महिन्यात ऑनलाइन चोरांचा धुमाकूळ वाढला असून त्यामुळे निष्पाप, सामान्य नागरिकांची मात्र मोठी फसवणूक होत आहे. असाच एक ऑनलाइन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची ऑनलाइन घोटाळ्यात फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका माजी पोलिस अधिकाऱ्याला ऑनलाइन घोटाळ्याचा फटका बसला होता. तर अभिनेता आफताब शिवादासनी याने ऑनलाइन फ्रॉडमध्ये मेहनतीची कमाई गमावली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ( निवृत्त ) रमेश देवकीनंदन धानुका यांची ऑनलाइन बँकिंग घोटाळ्यात ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफ.आय.आर. दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका (६२) यांना २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईल फोनवर एक मेसेज आला होता. फोनवरील व्यक्तीने त्यांना पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले. जर तुम्ही हे कार्ड अपडेट केले नाही, तर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते बंद होईल, असा इशारााही त्यांना देण्यात आला. त्यामुळे धानुका यांनी त्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्यांची वैयक्तिक माहिती भरली. मात्र तेथे असलेले सबमिट बटण दाबताच धानुका यांच्या खात्यातून थेट ४९,९९८ रुपये कापले गेले.












