मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी २४ तासात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सुरज मुकुंद उगले (वय- २० रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.
याबाबत मयुर शिवाजी कोऱ्हाळे (वय-२३ रा. शिवनेरी नगर, कोंढवा बु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी तीन जणांवर आयपीसी ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास शिवतिर्थ अपार्टमेंट समोर, शिवनेरी नगर येथे घडली होती.
मयुर कोऱ्हाळे हे त्यांच्या मामाच्या मुलासबोत दुकानात जात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीच्या आरोपींनी विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता आरोपींनी मयुर यांच्या नाकावर ठोसा मारुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच फिर्यादी यांच्या हातीतील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकून नेला. तर इतर आरोपींनी पाठीचा चावा घेऊन काठीने बेदम मारहाण केली होती. तसेच फिर्यादी यांच्या मामाच्या मुलाला देखील मारहाण केली होती.
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना आरोपी कान्हा हॉटेल चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी दोन अल्पवयीन आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त शाहूराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार निलेश देसाई, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सतीश चव्हाण, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.












