शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. टवाळखोरांकडून भररस्त्यात मुलींना अडवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात येत आहेत. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच मी इथला भाई आहे, जो मध्ये येईल त्याला मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ३८ वर्षीय आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आकाश मारुती शेलार (वय-२७ रा. जनता वसाहत, पुणे) याच्यावर आयपीसी २४१, ३५४ड, ५०६/२, पोक्सो अॅक्ट ११/४, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.२) दुपारी सव्वातीन ते साडेतीन दरम्यान जनता वसाहत येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपीने वारंवार पाठलाग केला. तसेच तिला भररस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला. मुलीने याबाबत घरी येऊन आईला सांगितले. त्यांनी आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता, मी इथला भाई आहे, मला कोणी बोलायचे नाही, जो मध्ये येईल त्याला मी मारुन टाकीन, मला तिच्याशी लग्न करायचे आहे, अशे म्हणत फिर्यादी यांना धमकी दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.












