सगळ्या जगाचे ज्या कडे लक्ष लागले ते प्रभू श्री रामाचं मंदिर अयोध्येत बांधलं जातं आहे. जवळपास ५७ देशांचे प्रतिनिधी त्यादिवशी भारतात येणार आहे. या मंदिरात २२ जानेवारी या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. रामलल्लाची मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन बसवली जाणार आहे. यानंतर आता या सोहळ्यावरुन आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण रंगलं आहे. अशात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. पत्नीशिवाय मोदी पूजा कशी काय करणार या आशयची एक पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसांच्या प्राणप्रतिष्ठा पूजेमध्ये औपचारिकमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. या सोहळ्यात चार पीठांचे शंकराचार्य या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. तसंच १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या वेळी श्रीरामाच्या दर्शनाला मी जाणार आहे असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. याआधी डिसेंबर महिन्यातही सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर अशाच प्रकारे टीका केली होती.
“पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राम भक्तांनी परवानगी कशी दिली? रामाने १४ वर्ष वनवास भोगला, पत्नी सीतेच्या सुटकेसाठी युद्ध केले. मोदींनी मात्र आपल्या पत्नीला सोडले, अशी त्यांची ओळख आहे. मग ते पूजा कशी काय करू शकतात?”
असं विधान भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. आता त्यांच्या या विधाना नंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता आहे.












