नाशिक : शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी बदली करण्याचे कारण समोर येते आहे . एका प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने संबंधित दोन्ही राजकीय नेत्यांनी आपापल्या नेत्यांचे वजन वापरून अंकुश शिंदे यांना हटविण्याची रणनीती वापरल्याची चर्चा सुरू असून , दोघांच्या भांडणात अंकुश शिंदे यांची गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्चस्वातून बदलीची चर्चा सुरू असून दोघांच्या भांडणात अंकुश शिंदे यांचा राजकीय बळी गेल्याचे समजते.
एका मद्यविक्री कंपनीत 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फिर्यादीला गृहमंत्र्यांशी जवळीक असलेल्या अमळनेरच्या एका माजी आमदाराचा पाठिंबा होता. तर संशयित हे थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने गुन्ह्याचा तपासही रेंगाळला. त्यावरून दोन्ही नेत्यांवरील राजकीय वर्चस्वातून बदली झाल्याची चर्चा सुरू आहे. मागच्या काही दिवसात अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता आणि व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली, तर पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात नियुक्त केले. परंतु अद्याप शिंदे यांनी नाशिक येथील पदभार सोडलेला नाही. तर कर्णिक देखील अजून त्याठिकाणी हजर झालेले नाहीत.
गृह मंत्रालयाने केवळ दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अचानक निर्गमित झाल्याने मंत्रालयापासून नाशिक व पुणे शहरात अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान दोन्ही अधिकारी मिळालेल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यास इच्छुक नसल्याचे समजते.
त्यातच आता शिंदे यांच्या बदलीमागे राजकीय वर्चस्व असल्याची चर्चा आहे. एका माध्यमाशी प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय दबावातून पुण्यातील तत्कालीन दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागल्या असल्याची प्रतिक्रिया दिली. यावरून शिंदे यांच्या बाबतीत नेमके काय घडले असेल हे ही पुढच्या काही दिवसात समोर येईल.












