क्रीडा मंत्रालयाचा निर्णय
ऑलम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी कुस्ती सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आणि बजरंग पुनिया यांनी त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आज केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेची नुकतीच निवडून आलेली समिती बरखास्त केली.
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या निकालात परिषदेचा माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह याचा निकटवर्तीय असलेला संजय सिंह नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आला होता . ब्रिज भूषणवर मलिक आणि इतर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत आणि त्याचा तपास सुरु आहे. त्याचे नातेवाईक किंवा निकटवर्तीयांना निवडणूक लढवू देणार नाही , असं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं असतानाही संजय सिंहला निवडणूक लढवता आणि जिंकता आली.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं ही समिती बरखास्त करताना सांगितलं , की नवी समिती परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्याचं दिसून आलं आहे, ‘ जो क्रीडा संहितेचा संपूर्ण अवमान आहे. मात्र या निर्णयावर उशिरा सुचलेले शहाणपण म्हणूनही टीका होताना दिसत आहे.












