मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. यातील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) अंतर्गत लोककला विभागातील पुरस्कार युवा लोककलावंत अभिनेता जगदीश कन्नमला जाहीर झाला आहे.
जगदीश कन्नम हा मूळचा हैदराबादचा असून त्याचा जन्म छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. मातृभाषा तेलुगु असली तरी शालेय शिक्षण हे मराठी भाषेतूनच झालं असल्याने मराठीशी त्याचं घट्ट नातं तयार झालं. मराठी भाषेच्या गोडीमुळे त्याला येथील कलेचं आकर्षण झालं. पुढे त्यानं छत्रपती संभाजीनगर मध्ये नाट्यशास्त्रातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्याच दरम्यान त्याने युवा महोत्सवात अनेक मराठी नाटकातून अभिनय करत स्वतःच अभिनय कौशल्य सिद्ध केलं. दरम्यान त्याला महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख झाली आणि त्यानं आपला कल लोककलेकडे वळवला. पुढे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून त्याने लोककलेचं प्रशिक्षण प्राप्त केलं.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी त्यानं मिळेल त्या मार्गातून लोककलेला सादर केल्या. यातून लोककलावंत होण्यासाठी वारसा लागत नाही तर लागते ती इच्छाशक्ती आणि जिद्द हे त्यानं सिद्ध केलं. दरम्यान त्यानं‘चला हवा येऊ द्या’ च्या रंगमंचावर भारूडाचे सादरीकरण केले. तसेच महाराष्ट्र सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध समाज प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यानं भारूड, जागरण-गोंधळ, तमाशा सारख्या पारंपारिक लोककलेचे सादरीकरण केले.
जगदीशला उपजतच उत्तम आवाज, स्वरज्ञान आणि तालाचे ज्ञान लाभले असल्यामुळे तो चतुरस्त्र लोककलावंत म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच अभिनयाची साद देखील त्याने सोडली नाही. लोककलेत दंग असताना त्याने स्वतःचे अभिनय कौशल्यही जोपासले. भाडीपाच्या लोकप्रिय ठरलेल्या “बेरोजगार” या वेबसिरीजमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोबत अक्षय ही मध्यवर्ती भूमिका त्यानं साकारली आहे. “जून” नामक चित्रपटात मोरेश्वर सारखी अवघड भूमिका साकारून त्यानं निर्भीड कलाकार असल्याचं सिद्ध केलं. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या “स्वराज्य जननी जिजामाता” मालिकेत मदारी मेहतर हे मुस्लिम पात्र त्यानं चोखपणे साकारलं. शिवाय “सेन्शियन्स” या इंग्रजी सिनेमात तर “पाउंड ऑफ फ्लेश” या तामिळ भाषेतील लघुपटात त्यानं भूमिका साकारल्या आहेत.
अशा चतुरस्त्र कलाकाराची दखल यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराने घेतली आणि त्याला लोककलेतील योगदानासाठी पुरस्कार जाहीर झाला. या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण दिनांक २१ जानेवारी,२०२४ रोजी सकाळी १२ वाजता अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.












