प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारीही सुरू करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने काढले, त्याला दोन आठवडे झाले तरी अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही.केवळ मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे ही सेवा सुरू झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
करोना काळात पुणे रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद केली होती. करोनाचे सावट संपल्यावर ही सेवा सुरू झाली. मात्र, दुपारच्या सत्रातील लोकल सेवा बंद होती. नागरिकांकडून अनेक वेळा दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. काही वेळा रेल्वे अडविण्याच्या घटना घडल्या.
विद्यार्थी, व्यापारी यांच्याकडून दुपारच्या सत्रात लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. नागरिकांची आंदोलने आणि रोष पाहून रेल्वे बोर्डाने दुपारच्या सत्रात शिवाजीनगरहून १२ वाजून ०५ मिनिटांनी आणि लोणावळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे परिपत्रक १२ जानेवारीला प्रसिद्ध केले होते. पण, अद्याप लोकल सेवा सुरू झालेली नाही.












