गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील असे सांगून महिलेकडून लाच स्वीकारणाऱ्या एका वकिलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. सुमित नामदेवराव गायकवाड (वय-२५ रा. सेवागिरी निवास, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी (दि.१० जानेवारी) केली आहे. सुमित गायकवाड याला लाच घेण्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार गोपाळ हरिश्चंद्र पवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम यांनी मंगळवारी (दि.१६) काढले आहेत.
काय आहे प्रकरण?
याबाबत २५ वर्षीय महिलेने पुणे लाच लुच पथकाकडे तक्रार केली आहे. एसीबीच्या पथकाने ३, ४ आणि ८ जानेवारी रोजी पडताळणी करुन बुधवारी (दि.१०) ही कारवाई केली. तक्रारदार ह्याचे व्यक्तिगत अडचणीमुळे पोलीसांनी तक्रारदार यांच्या दोन मित्रांना कोथरुड येथील शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे घेवून गेले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मित्राच्या ओळखीचे वकील सुमित गायकवाड याने तक्रारदार यांच्यावर व दोन्ही मित्रावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो असे सांगून ५ लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर ॲड. सुमित गायकवाड याने तक्रारदार यांचेकडून १ लाख रुपये व तक्रारदार यांच्या मित्रांकडून फोन पे द्वारे ५५ हजार रुपये असे एकुण १ लाख ५५ हजार रुपये घेतले होते. तसेच उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्रारदार ह्यांचा विरुद्ध असलेला पुरावा मी नष्ट करणार नाही, असे सांगून अजून रुपये ३ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्यालयात दिली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, खाजगी इसम ॲड. सुमित गायकवाड याने तक्रारदार यांच्याकडे व त्यांच्या मित्राला कोथरुड पोलिसांकडून सोडविण्यासाठी तसेच तकारदार यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी साडे तीन लाख रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी केली. त्यापैकी २० हजार रुपये फोन पे द्वारे त्याच्या अकाऊंट मध्ये मागणी करुन पोलिसांसाठी लाच स्विकारली. आरोपी ॲड. सुमित गायकवाड याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७(अ) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.












