विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतुस, दुचाकी असा एकूण ५० हजार ५०० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२०) हिंजवडी ते कासारसाई कडे जाणाऱ्या रोडवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
सचिन पवार (वय-१९ रा. माळीमळा, सनसवाडी, ता. शिरुर, मुळ रा. पाचेगाव वसंतनगर तांडा, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याच्यावर आर्म ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश आनंदराव बलसाने (वय-५१) यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ते कासारसाई कडे जाणाऱ्या रोडवर पर्पल बिल्डरसच्या मोकळ्या जागेत एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३० हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी पिस्टल आणि ५०० रुपयांचे एक जिवंत काडतुस सापडले. पोलिसांनी पिस्टल, काडतुस आणि दुचाकी असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास हिंजेवाडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे करीत आहेत.
विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केली अटक, 1 पिस्टल 1 काडतुस जप्त












