नवी दिल्ली : आपल्या मागण्या घेऊन पंजाब, हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडं येत आहेत. त्यामुळं दिल्लीजवळील सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हे सर्व शेतकरी सध्या शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा इंटरनेट सेवेवरील बंदी वाढवण्यात आलीय.
सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा होणार चर्चा : ‘मएसपी’ह विविध मागण्यांबाबत शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. दिल्लीकडं कूच करण्यासाठी सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येनं जमले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही अनेकवेळा प्रशासनावर दगडफेक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या झटापटीत अनेक पोलीस कर्मचारी आणि शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं हरियाणा सरकारनं राज्यातील सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील निर्बंध पुन्हा एकदा वाढवले आहेत. तर तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्यांदा चर्चा होणार आहे.












