राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटिस आली होती. त्याप्रमाणे रोहित पवार आज ईडी कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
रोहित पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंसोबत ईडी कार्यालयात गेले. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात करुन विजय मिळवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्याकरता संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू. सत्याच्याच मार्गानं चालण्याचा यशवंतराव चव्हाणांचा वारसा आम्ही चालवतोय. आमच्या लढाईल दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातोय.
केंद्राच्या एका अधिकृत डेटानुसार इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या 90 ते 95 टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहे. रोहितनं संघर्षयात्रा काढली होती. कदाचित हे त्याचंच सूडाचं राजकारण असू शकतं. हे शक्तीप्रदर्शन नाही. यात प्रेम आणि नाती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्या भावासाठी इथे यावंसं वाटतंय.












