आपल्या बहिणीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन हत्याराने वार करुन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून हा प्रकार मंगळवार (दि.१९) रोजी रात्री साडे अकरा ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान बालेवाडी येथील गोल्डन टेरेस सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत घडला.
राजेश कांबळे (वय-२५ रा. बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय युवकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल शेषराव रिकामे (वय-२० रा. बालेवाडी), सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय-२० रा. बालेवाडी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ५०६ (२), ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल रिकामे व मयत राजेश हे एकमेकांचे मित्र होते. तर फिर्यादी तरुण आरोपीचा ओळखीचा आहे. राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे या तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुल याला होता. या संशयावरून आरोपींनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन राजेशचा मृत्यू झाला. आरोपींनी राजेश याचा खून करून त्याची दुचाकी वाकडच्या नदीमध्ये फेकून देऊन पुरावा नष्ट केला. घटनेचा पुढील तपास चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.












