पुणे : ‘इथून जायचे असेल तर ५ हजार द्यावे लागतील’ असे म्हणत एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना विमाननगर येथील एअरपोर्ट रोडवर घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ जानेवारी रोजी एअरपोर्ट रोडवरील संजीवन बेकरी समोर रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे.
याबाबत गौरव अमर सुतार (वय-२१ रा. संजय पार्क, एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साजिद वहिद अब्दुल (वय-१९ रा. लेन नं. ५ एफ, मदीना मस्जिदजवळ, विमाननगर, पुणे) याला अटक केली आहे. तर त्याच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन साथीदारावर आयपीसी ३९२ ३२३ ५०४ ५०६ ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव सुतार हे 11 जानेवारी रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास पायी घरी जात होते. संजीवन बेकरी समोर आरोपी साजिद आणि त्याच्या साथीदाराने गौरव याला आमच्याकडे रागाने का बघतो असे म्हणत शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तुला इथून जायचे असेल तर आम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत पैशांची मागणी केली.
गौरव याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर साजिद याने गौरवच्या पँन्टच्या खिशातून जबरदस्तीने १६०० रुपये काढून घेतले. त्यानंतर अजून पैसे दे म्हणत मारहाण करुन गौरवच्या मोबाईलवरुन ऑनलाईन एक हजार रुपये जबरदस्तीने स्ट्रान्सफर करुन घेतले. याबाबत गौरव सुतार याने मंगळवारी (१६) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी साजिद अब्दुल याला अटक केली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन करीत आहेत.












