न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज फिन अॅलन याने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने तब्बल १६ षटकार मारत न्यूझीलंडला सामना एकहाती जिंकवून दिला. न्यूझीलंडने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. अॅलनने एका डावात १६ षटकार मारत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. बुधवारी ड्युनेडिनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ६२ चेंडूत १३७ धावा करत अॅलनने विक्रमांच्या यादीत आपले नाव नोंदवले.
अॅलन शतक करत तो आता न्यूझीलंडकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक खेळी करणारा फलंदाज बनला आहे. या खेळीच्या जोरावर त्याने ब्रॅडंन मॅक्क्युलमच्या १२३ धावांच्या सर्वोत्तम खेळीला मागे टाकले, जी टी-२० मधील कोणत्याही किवी खेळाडूची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासह त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
डेव्हॉन कॉनवे सात धावांवर लवकर बाद झाल्यानंतर अॅलनने टीम सेफर्टसह दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. आक्रमक अॅलनला स्ट्राइकवर ठेवण्यासाठी सेफर्टने फक्त त्याला साथ दिली. त्याने धावा काढण्यावर लक्ष केंद्रित करत सहाय्यकाची भूमिका बजावली. अॅलनच्या खेळीदरम्यान अंपायरने तीन वेळा चेंडू बदलला, यावरून तो किती ताकदीने चेंडू मारत होता, हे समजू शकते. अॅलनची शानदार खेळी १८व्या षटकात संपुष्टात आली. जमान खानच्या एका ऑफ कटर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी यावेळी खेळ भावना दाखवत त्याचे कौतुक केले.












