मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले. मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात श्री. साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते.
यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती, मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे. त्यामुळे मधा बरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य, मधाचे व मधमाशांचे विविध प्रकार, व मधापासुन तयार होणारी विविध उत्पादने, तसेच सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासुन विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक दुपारी १२.३० वाजता आकर्षणाचे केंद्र असणार आहे.












