पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या नावाखाली खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
१७,८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतू वरील टोल २००० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा निम्मा आहे. १७८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि तो वाहतुकीसाठी खुला झाला.
या रस्त्यावर कारसाठी जाऊन येऊन टोल ३७५ रुपये आहे. मात्र, २४ वर्षांपूर्वी २,००० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या व आजवर दहा हजार कोटी रुपयांहून अधिक टोल वसुली झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजही कारसाठी जाऊन येऊन टोल ६४० रुपये आहे. आणि २०३० पर्यंत ही वसुली सुरूच राहणार आहे.
आधुनिक काळातील हे आठवं आश्चर्य मानावं, की या खुले आम चाललेल्या लुटीबद्दल संताप व्यक्त करावा, हे कोडं उलगडत नाही, असेही वक्तव्य वेलणकर यांनी केले आहे.












