इंडिया आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ममता यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा भाग होता.ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी इंडिया आघाडीच्या फेम आणि भविष्यावर आता खूप प्रश्न उपस्थित होत आहे.
ममता बॅनर्जींनी ही घोषणा केली तेव्हा उपेक्षेची वेदना आणि कटुताही दिसून आली. मी ज्या काही सूचना दिल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आम्ही एकट्याने बंगालला जायचं ठरवलं. राहुल गांधींचे नाव न घेता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपण पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहोत, याविषयीची माहितीही त्यांना सौजन्याने दिली गेली नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या सगळ्याबाबत आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.’ अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी 28 विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या बॅनरखाली एका व्यासपीठावर एकत्र आले होते. विरोधकांनी एकजूट करून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभूत करून निवडणुकीचे आव्हान देण्याची योजना आखली होती, मात्र आता बंगालमध्ये ममतांनी विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे.












