पुणे महापालिकेच्यावतीने आशानगर येथे पाण्याची वीस लाख लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या उद्घाटन समारंभासाठी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेतला असून आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते.
मात्र या पाण्याच्या टाकीला जागा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले होते. त्यांना या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून स्थानिक माजी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेसचे काही कार्यकर्ते तसेच उबाठा गटाचे कार्यकर्ते यांनी या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर आल्यावर त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आशानगर परिसरात सकाळपासून पोलिस तैनात करण्यात आले आहेत, पोलिस, कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, जेष्ठ नेते शरद पवार गट यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.












