अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल’, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? असे म्हणत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.
यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, अजित पवार यांचे वक्तव्य भयानक आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. ज्यांनी समाजात स्थान दिले, त्यांच्याबद्दल असे बोलणे अयोग्य आहे. राजकारणासाठी खालच्या स्तरावर जाणे हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही. ते वडिलांसारखे आहेत. ज्यांनी तुम्हाला राजकारणात स्थान निर्माण करून दिले आहे त्यांच्यावर असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली आहे.












