कंपनीची मिळालेली मोठी ऑर्डर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती येथील दोघांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार मार्च 2022 ते आजपर्य़ंत वारजे येथील कात्रज देहुरोड बायपास हायवेरील आर स्क्वेअर बिल्डींग जवळ घडला आहे. याबाबत प्रसाद चंद्रकांत दिवाकर (वय-50 रा. चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून मेसर्स डी.एस. पवार चे मालक दामोदर श्रीपती पवार, गणेश दामोदर पवार (दोघे रा. बालाजी निवास, गुरुकुल हौसिंग सोसायटी, भिगवण रोड, बारामती) यांच्यावर आयपीसी 420, 406, 465, 467, 468, 471, 472, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसायाकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशिनरी विक्री व दुरुस्ती करण्याचा भागिदारीत व्यवसाय आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून एक मिनी कॉम्पॅक्टर मशीन खरेदी करुन त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर एका कंपनीची मोठी ऑर्डर मिळाल्याचे भासवून कंपनीचे बनावट सही शिक्का असलेली ऑर्डर फिर्य़ादी यांना दाखवली. तसेच ही ऑर्डर फिर्यादी यांना देण्याचे आश्वासन देवून त्याबदल्यात वेळेवेळी आर.टी.जी.एस द्वारे 57 लाख 83 हजार 500 रुपये घेतले.
तसेच फिर्यादी यांच्या एस.एस.हेवी इक्विपमेंट प्रा. लि. कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी करीत आहेत












