पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : ग्रुप मधून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगाराने ऑफिसचे नुकसान करत मालकाला देखील मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अमोल ढोबळे ( वय ३१, रा. खांदवेनगर, लोहगाव, पुणे ) यांनी त्यांच्या एका कामगारा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जुना मुंढवा रोड, चंदननगर येथे इंन्स्टा गो. प्रा. लिमी नामक ऑफिस आहे. या ऑफिस मधील एक कर्मचारी याच्या विरुद्ध क्लाएंटच्या तक्रारी येत होत्या. फिर्यादी यांनी वेळोवेळी समजावून सांगून सुद्धा तो कामात सुधारणा करत नव्हता.
फिर्यादी यांनी दि. ०१ रोजी पुन्हा समजावून सांगण्याकरिता आरोपीस फोन केला असता त्याने तो उचलला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास ग्रुप मधून काढून टाकले. आपल्याला ग्रुप मधून काढून टाकल्याच्या रागातून आरोपीने ऑफिस मध्ये येऊन तू मला ग्रुप मधून का काढले असे म्हणत तू बाहेर ये तुझ्याकडे बघून घेतो अशी धमकी देऊन ऑफिस मधून निघून गेला. काही वेळाने पुन्हा ऑफिसमध्ये येऊन शिवीगाळ करत हातात आणलेल्या बांबूने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर मारले. तसेच त्यांचा आयफोन फोडत ऑफिस मधील काचा फोडून फिर्यादी यांचे नुकसान केले आहे.
आरोपी विरोधात भादवि कलम ३२४, ५०४,५०६,४२७, महा. पो. का. क. ३७ ( १ ) १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बुधवंत हे करीत आहेत.












