महिलेचा पाठलाग करुन तिच्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग केल्याची घटना पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून २० नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.
याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर संजय शिंदे (वय-३० रा. कोलोंसेस ग्रिनसिटी, देहु-आळंदी रोड, पुणे) याच्यावर आयपीसी ३५४, ३५४(अ) (ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने फिर्यादी महिलेचा सतत व्हॅगनर कारमधून पाठलाग केला. तसेच महिलेला व्हॉट्सॲपवरून अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवले. आरोपीने अश्लील व्हिडीओ कॉल करून वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












