मोटारसायकलची रेस करत असल्याच्या कारणावरून एका ५० वर्षाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पाण्याच्या हौदात बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२०) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान उरुळी देवाची गावातील खंडोबा माळ येथे घडली.
दादा ज्ञानदेव घुले (वय-५० रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष राजेंद्र धोत्रे (वय-३७ रा. खंडोबामाळ, ता. हवेली) याच्यावर आयपीसी ३०२, ५०६ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत दादा घुले यांचे पुतणे प्रथमेश संतोष घुले (वय-१९ रा. घुले वस्ती, मांजरी रोड, दत्त मंदिरासमोर, मांजरी बु.) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दादा घुले हे फिर्यादी यांचे चुलते आहेत. तर आरोपी मयत दादा घुले यांच्या चाळीत भाडेकरु म्हणून राहतो. फिर्य़ादी यांचे चुलते दादा घुले हे मोटारसायकलची रेस करत असल्याच्या कारणावरुन आरोपीने वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपी संतोष धोत्रे याने फिर्यादी यांच्या चुलत्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर दादा घुले यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवले. नाकातोंडात पाणी गेल्याने दादा घुले यांचा गुदमरुन मृत्यू झाला. फिर्यादी यांनी फिर्याद देताच पोलिसांनी आरोपी संतोष धोत्रे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.












