
पुणे : काही दिवसांपूर्वी चिखली मोशी येथील उद्यानासाठी आरक्षित जागा महानगरपालिकेने हॉर्स रायडिंग साठी दिल्यामुळे नागरिकांनी याबद्दल निषेध व्यक्त केला होता. तसेच याने नागरिकांचा फायदा होईल आणि उद्यान जवळच असलेल्या दुसऱ्या आरक्षित जागेत बनवून देऊ असे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले होते.
मात्र या आरक्षित जागेच्या भोवताली अनेक गृह निर्माण प्रकल्प आहेत. ज्यांची जास्त किमतीला विक्री होत असते. त्यामुळे महापालिका ही आरक्षित जागा हॉर्स रायडिंगच्या नावाखाली खाजगी व्यक्तीच्या घशात घालत असल्यामुळे रूपाली अल्हाट यांनी काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते.पण त्याचा काहीच पाठपुरावा न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची हाक पुकारली आहे.
प्रशासनाला नागरिकांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही का ? फक्त आश्वासने मिळाली न्याय नाही मिळाला. आता उपोषण तोपर्यंत जोपर्यंत न्याय नाही. माझे प्राण गेले तरी बेहत्तर पण बालकांना आणि वृद्धांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
उद्या दि. ०८ सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे.












